उरण:सुनिल ठाकूर
दिनांक २७ ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान गोरखपूर येथील सय्यद मोदी रेल्वे स्टेडियम मध्ये पार पडलेल्या CISCE राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध वयोगटांमध्ये महाराष्ट्राच्या संघांनी आपली ताकद सिद्ध करून राज्याचा झेंडा उंचावला.
ही स्पर्धा गोरखपूर येथील सय्यद रेल्वे स्टेडियम मध्ये स्टेपिंग स्टोन इंटर कॉलेज गोरखपुर यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांच्या एकूण १५ संघाने भाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंडर-१४ गटात महाराष्ट्राच्या संघाकडून शर्वरी नेमाने, अवनी लुंकड, राशी तलरेजा, वृष्टी गुप्ता, अरणा बोराडे, काशवी मुच्छाळ, आकायशा सेठ, गिरिजा आडनाईक, शनाया शहा, अनया गावंड, अर्णा कल्याणी, जेश्ना शेट्टी या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी केली असून उपांत्य फेरीत कर्नाटक सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्यासाठी त्यांनी अनुकरणीय कामगिरी दाखवून उपविजेतेपद पटकावले परंतु अंतिम फेरीत यजमान संघ उत्तर प्रदेश कडून पराभव पत्करावा लागला. तसेच अंडर-१७ गटाच्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशवर मात करत ऐतिहासिक विजय मिळविला व अंडर-१९ गटात उपविजेतेपद पटकावले.
या यशामध्ये खेळाडूंच्या जिद्दीबरोबरच प्रशिक्षक व व्यवस्थापन समितीच्या अथक परिश्रमांचीही मोलाची भूमिका असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे संघाने उत्कृष्ट कामगिरी साधली आहे. तसेच ही कामगिरी राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.