उरण:सुनिल ठाकूर
– नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी रोहा-पेण तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांची भव्य मोर्चाची तयारी सुरु झाली आहे. हा नवी मुंबई विमानतळ धडक मोर्चा ! सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ : सकाळी १० वाजता करावे - गणपत शेठ तांडेल मैदान ते नवी मुंबई विमानतळ रेती बंदर गेट येथे लाखोंच्या संख्येने काढण्यात येणार असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असल्याचे दिसून आले.
शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष ॲड. रोशन पाटील यांनी नागोठणे येथे आयोजित बैठकीत या आंदोलनाची घोषणा केली. ते म्हणाले की, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांचे नाव देण्यात यावे, ही स्थानिकांची दीर्घकाळाची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याकरिता संघर्ष सुरू आहे. परंतु केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. उलट विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी वेगाने सुरू आहे. त्यामुळे भूमिपुत्रांच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी प्रथम नाव निश्चित करावे आणि त्यानंतरच विमानतळाचे उद्घाटन व्हावे, ही आमची ठाम मागणी आहे.”
या मोर्चामध्ये रोहा व पेण तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना, तसेच हजारो नागरिक सहभागी होणार आहेत. लोकनेते दि.बा. पाटील यांच्या स्मरणार्थ हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असून, जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही ॲड. रोशन पाटील यांनी यावेळी केले.