उरण : सुनिल ठाकूर
भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा (Cervical Cancer) कर्करोग रोखण्यासाठी आता डिजिटल व्यासपीठाचा वापर केला जाणार आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि आरोग्यसेवा पुरवठादार आणि बजाज फिनसर्वचा भाग असलेली विदाल हेल्थ यांनी यासंबंधीची महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे.
१ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात हे डिजिटल व्यासपीठ कार्यान्वित होणार आहे. या माध्यमातून महिला रुग्णांना एचपीव्ही (HPV) लसीकरणाचा अनुभव कॅशलेस, पेपरलेस आणि संपूर्णपणे डिजिटल मिळणार आहे.
या व्यासपीठावर डॉक्टरची वेळ ठरवण्यापासून ते संमतीपत्र भरणे आणि प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन होतील. तसेच, लसीच्या डोसच्या वेळापत्रकाचे रिमाइंडर्स आणि उपचारांचे सातत्य राखण्यासाठी व्यवस्थापन मदत करेल.
आरोग्यसेवा प्रतिबंधात्मक उपचारांकडे वळत असताना, या उपक्रमामुळे लोकांमध्ये त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्याची क्षमता वाढेल, असे मत बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज यांनी व्यक्त केले.
सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले की, एचपीव्ही लस हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, पण त्याचा प्रभाव वाढविण्यासाठी त्याची उपलब्धता आणि जनजागृती गरजेची आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने लसीकरण अधिक कार्यक्षमपणे करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.
या उपक्रमामुळे हॉस्पिटलायझेशन आणि वैद्यकीय खर्च कमी होण्यास मदत होईल, असे विदालच्या कार्यकारी संचालिका नीथा उत्तय्या यांनी स्पष्ट केले.