-->
आपला महाराष्ट्र 24

उरण कराना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण ओव्हर फ्लो - उरण करांची पाण्याची चिंता मिटली


उरण (सुनिल ठाकूर )- रानसई धरण क्षेत्रात गेल्या  दिवसांत चांगला पाउस झाल्यामुळे हे धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे  उरण तालुक्यातील पीण्याच्या पाण्याचे संकट दुर झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून रानसई धरण क्षेत्रात जवळ-जवळ 865 मी.मी. पेक्षा जास्त पाउस झाला असल्यामुळे हे धरण आत्ता पुर्ण क्षमतेने भरले आहे. सोमवार ता.15 जूलै  रोजी सकाळी 11.45 वाजल्या पासून हे धरण ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली. सध्या या धरणाची  पाण्याची पातळी ११६.५ फूटाच्या वरती आहे.अशी माहिती एम्आयडीसी उरण कार्यालयाचे उपअभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.

            गेल्या वर्षी हे धऱण 18 जलैला ओसंडून वाहू लागले होते. यावर्षी पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला नव्हता त्यामुळे हे धरण अद्याप पर्यंत भरले नव्हते. रानसई धरणाची उंची १२० फूट जरी असली तरी धरणाची पाण्याची पातळी ११६.६ फूट एवढी झाली की हे धरण ओव्हर फ्लो होते. अर्ध्या अधिक उरण तालुक्याची तहान रानसई धरण भागवते. रानसई धरणातून सध्या उरण नगरपरिषद, २१ गावे आणि एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस् या प्रकल्पांना पाणी पुरवठा केला जातो. आत्ता धरण भरल्यामुळे उरणच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. निसर्गाच्या कुशीत डोंगर दऱ्यांमध्ये हे रानसई धरण आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक या धरणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि या धरणावरून पडणाऱ्या पाण्याच्या धारा अंगावर झेलण्यासाठी येत असतात.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.