सालाबादप्रमाणे या वर्षी ही भेंडखळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी चे औचित्य साधून श्री विठोबा देव भेंडखळ ,श्री जरीमरी आई जिर्णोध्दार मंडळ, भेंडखळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ आणि काव्य दरबार -उरण यांच्या संयुक्त विद्यमाने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कविसंमेलनास जिल्हा व जिल्ह्याबाहेरील कवी ही आवर्जून उपस्थित होते. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान भेंडखळ गावचे ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत यांनी भूषविले;तर प्रमुख अतिथी म्हणून कोमसाप घणसोली चे अध्यक्ष ज्येष्ठ कवी शांताराम लोखंडे, आगरी कवितांचे बादशाह पुंडलिक म्हात्रे,इतिहासाचार्य काशिनाथ मढवी ,श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे अध्यक्ष उद्धव घरत आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.श्री विठ्ठल रखुमाई चे पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.काव्य दरबार चे विद्यमान अध्यक्ष प्रकाश ठाकूर यांनी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले; तर के.एस.ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.सौ. मिनल माळी यांनी काव्य दरबार या संस्थेचा थोडक्यात परिचय करून दिला. कविसंमेलनाची सुरुवात काव्य दरबार चे उपाध्यक्ष अरुण द.म्हात्रे यांच्या सुश्राव्य गणेश वंदनेने झाली.या कविसंमेलनात सर्वश्री भगवान ठाकूर,हरिश्चंद्र माळी,मंगेश घरत,अनंत पाटील, अरुण पाटील,दिगंबर कोळी,महादेव सोळगे आदि कवींनी आपल्या भक्तिमय रचना सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.या कविसंमेलनाचे सुरेख सूत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले.सरते शेवटी प्रकाश ठाकूर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानल्यानंतर या भक्ती रसाने ओथंबलेल्या कार्यक्रमाचे सूप वाजले.
भेंडखळ येथे 'काव्य दरबार 'चे कविसंमेलन संपन्न.
byमुख्य संपादक - सुनील ठाकूर
•