उरण (सुनिल ठाकूर )
कुठलाही राजकीय पक्ष मेहनती आणि सक्रिय कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर यशस्वी ठरत असतो. याच कारणासाठी प्रत्येक राजकीय पक्ष, जसे जोहरी हिरा जोखतात त्याप्रमाणे सकस आणि योग्य कार्यकर्ते जोखत असतात. असेच काहीसे डॉ. मुनीर तांबोळी यांच्या बाबतीत घडले आहे.
पनवेल येथे राहून, गेली अनेक वर्ष निस्वार्थी बुद्धीने, संपूर्ण भारतात समाजसेवा करत असलेल्या या समाजसेवकाची, समाजातील पत व किंमत, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने ओळखली आणि मोठ्या सन्मानाने डॉ. मुनीर तांबोळी यांना काँग्रेस पक्षात सामावून घेण्यासाठी आवाहन केले. या महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या आमंत्रणाला, डॉ. मुनीर तांबोळी यांनी देखिल सकारात्मक प्रतिसाद देऊन, आपल्या राजकीय वाटचालीची मुहूर्तमेढ रोवली. समाजसेवक डॉ.मुनीर तांबोळी यांची, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, वाणिज्य व उद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य, या पदी नियुक्ती करण्यात आली.
सदर नियुक्ती पत्र मोठ्या सन्मानाने, एका समारंभात डॉ. मुनीर तांबोळी यांना प्रदान करण्यात आले. या छोटेखानी पण शानदार समारंभात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली व डॉ. मुनीर तांबोळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी देऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष सर्वश्री जनक व्यास, महासचिव ऍड. नेहा राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशासकीय सल्लागार प्रज्ञा वाघमारे, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल पाटील, जयश्री पाटील आदी अनेक वरिष्ठ पदाधिकारी, तसेच अनेक जिल्ह्यातील समित्यांचे जिल्हा अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
डॉ. मुनीर तांबोळी यांच्या या राजकीय प्रवेशाबद्दल सर्वत्र सकारात्मक चर्चा होत असून, डॉ. मुनीर तांबोळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर नियुक्तीला उत्तर देताना डॉ. मुनीर तांबोळी म्हणाले, गेली इतके वर्ष मी समाजकार्य अत्यंत निस्वार्थी भावनेने आणि कठोर परिश्रम करीत निभावून नेले. आज या परिश्रमाचे, काँग्रेस पक्षाने योग्य मूल्यमापन करून, मला उचित असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सदर जबाबदारी निभावताना, मी समाजामध्ये माझे व महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे नाव उज्वल राहील, याची काळजी घेईन. पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी सर्वतोपरी उतरेन याची मला खात्री आहे. या कामात मला सर्व पक्षश्रेष्ठींची व महाराष्ट्राच्या जनतेची साथ अत्यंत महत्त्वाची आहे. मला इतक्या महत्त्वाच्या पदी रुजू करणाऱ्या, सर्व पक्षश्रेष्ठी आणि जनतेचा, मी ऋणी आहे व आजन्म ऋणी राहीन. तसेच महाराष्ट्रातील वाणिज्य व उद्योग यांच्या प्रगतीसाठी मी सतत प्रयत्नशील राहीन.
टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या वक्तव्याचे स्वागत करीत, उपस्थितांनी त्यांना मानवंदना दिली. सदर पदभार त्वरित स्वीकारून, डॉ. मुनीर तांबोळी कार्यरत झाल्याची घोषणा पक्षश्रेष्ठींनी केली आणि समारंभाची सांगता झाली. त्यावेळी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर, उपसंपादक राज सदावर्ते,दैनिक बेधडक महाराष्ट्राचे मुख्य संपादक अभिजित दरेकर, कार्यकारी संपादक संकेत घेवारे, शरद ठाकूर आदी अभिनंदन केले.
