-->
आपला महाराष्ट्र 24

बाहेरून येणाऱ्या गणेशमूर्तींचा चिरनेरच्या कला नगरीला फटका. पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर परिणाम मूर्तिकारांचे ग्राहक वर्षागणिक रोडावत चालले आहेत.


उरण: सुनिल ठाकूर

गेल्या कित्येक पिढ्यांपासून चिरनेर  या इतिहास प्रसिद्ध गावातील चिरनेर कलानगरीत  गणेशमूर्ती तयार करण्याचे काम केले जात असून, सध्या येथील कारखान्यात शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कामाची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार महिने आधीच येथील मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र चिरनेर कला नगरीच्या परिसरातच नव्हे तर संपूर्ण उरण तालुक्यात बाहेरून पेंटिंग केलेल्या तयार गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असल्याने, येथील पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. येथील पिढीजात कुंभार समाजाच्या मूर्तिकारांचे ग्राहक वर्षागणिक  रोडावत चालले आहेत. त्यामुळे येथील मूर्तिकरांचा  व्यवसाय अडचणीत आला आहे. खेड्यापाड्यात गणेश मूर्तींच्या  विक्रीची दुकाने थाटली गेली असल्यामुळे, नव्या ग्राहकांबरोबर जुने ग्राहकही मोठ्या प्रमाणावर  कमी झाले असल्याची  खंत येथील मूर्तिकार गजानन चौलकर, प्रसाद चौलकर, भाई चौलकर, दामोदर चौलकर संदेश चौलकर, सुनील चौलकर, नंदकुमार चिरनेरकर, विलास हातनोलकर, जीवन  चौलकर, नरेश हातनोलकर, रंगनाथ चौलकर यांनी व्यक्त केली. चिरनेर कलानगरीत शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम आत्ता  फार कमी झाले असून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  मूर्ती पेण येथून  आणून त्यांना रंगकाम करून त्या ग्राहकांना विकल्या जातात. फार कमी कारखान्यातून शाडू मातीच्या मूर्ती घडविल्या  जात आहेत.


 गेल्या पाच पिढ्यांपासून आजपर्यंत 100%   गणेश मूर्ती आमच्या कारखानात शाडू मातीच्याच घडविल्या जातात. त्यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्ती पसंत करणारे नवे जुने ग्राहक आमच्या कारखान्यात येऊन, दोन महिने आधीच गणेश मूर्ती  बुकिंग  करतात‌.  ग्राहकांच्या पसंतीच्या फोटो नुसार गणेश मूर्ती आम्ही साकारतो. पण बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तीमुळे आमच्या गणेश मूर्तींच्या मागणीत मोठी घट झाली  आहे. 


 ( *मूर्तिकार भाई चौलकर, सुनील चौलकर* )


आमच्या कुंभार समाजाचा हा पिढीजात  व्यवसाय असून आत्ता केवळ  मूर्तिकला जोपासण्या पुरताच हा व्यवसाय उरला आहे.  यात खूपच चढउतार आहेत. पण या चढ उताराची पर्वा न   करता कला टिकवून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

( *मूर्तिकार गजानन चौलकर व  नंदकुमार चिरनेरकर* )
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.