नवी मुंबईमध्ये ४६ वर्षे वयाच्या रुग्णावर सायनस वेनोसस ऍट्रिअल सेप्टल डिफेक्ट (एएसडी) स्टेन्टिंग करून त्यांचे प्राण वाचवले. मुंबई- नवी मुंबईमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली आहे. जन्मजात हृदय विकारांवर उपचार करण्यात हे एक अतिशय महत्त्वाचे पुढचे पाऊल मानले जात आहे.
नियमित हेल्थ चेकअप करतेवेळी ४६ वर्षांच्या सुनील यांच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये एक धक्कादायक बाब आढळून आली. त्यांच्यामध्ये पार्शियल अनोमल्स पल्मनरी वेनस कनेक्शन (पीएपीव्हीसी) सह मोठा सायनस वेनोसस ऍट्रिअल सेप्टल विकार होता आणि तो बरीच वर्षे लक्षातच आला नव्हता. एकावेळी जन्मलेल्या दर १५०० पैकी फक्त एकामध्ये हा विकार असू शकतो. हे अनपेक्षित निदान करण्यात आल्याने सुनील आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला, पण त्यामुळे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये प्रगत
उपचारांचा मार्ग खुला झाला. पत्रकारांना माहिती देताना सुनील म्हणाले, एप्रिलमध्ये नियमित हेल्थ चेकअप करून घेताना तपासणीदरम्यान माझ्या हृदयामध्ये काही गडबड आहे असे जाणवले, त्यासाठी पुढील तपासण्या करून घेतल्या, तेव्हा लक्षात आले की माझ्या हृदयात छिद्र होते. डॉ भूषण यांनी मला एएसडी स्टेन्टिंग करून घेण्याचा सल्ला दिला. ते केल्यानंतर माझी तब्येत पूर्णपणे बरी झाली. २९ जुलै रोजी श्री सुनील यांनी पेडियाट्रिक कार्डिओलॉजीचे सिनियर कन्सल्टन्ट डॉ भूषण चव्हाण यांच्या तज्ञ देखभालीखाली उपचार घेण्यास सुरुवात केली. हे मिनिमल इन्वेसिव तंत्र अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील अत्याधुनिक कॅथ लॅबमध्ये करण्यात आले. GORE-TEX पॅचने कव्हर करण्यात आलेल्या विशेष कस्टमाइज्ड ६९ सेमी लांब, १४ मिमी व्यासाचा स्टेन्ट बसवण्यात आला. अपोलो हॉस्पिटलच्या पेडियाट्रिक कार्डिओलॉजीचे सिनियर कन्सल्टन्ट डॉ भूषण चव्हाण यांनी सांगितले की सायनस वेनोसस एएसडीच्या रुग्णांसाठी ही एक खूप मोठी प्रक्रिया आहे, खासकरून ज्यांच्यावर पारंपरिक सर्जरी केली जाऊ शकत नाही अशा रुग्णांसाठी ही प्रक्रिया खूप उपयुक्त आहे. प्रक्रियेनंतर लगेच रुग्णाला एक्स- ट्यूबेट करण्यात आले. हा रुग्ण फक्त दोन दिवसांत घरी जाऊ शकला. या प्रक्रियेविनाही हा रुग्ण याहीपुढचे आयुष्य जगू शकला असता पण साठीनंतर त्याला विविध अडचणींचा सामना करावा लागू शकला असता असे डॉ. भूषण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.