उरण (सुनिल ठाकूर ).
नवी मुंबई टीटीसी औद्योगिक क्षेत्रात २०० झाडांची कत्तल करून झोपडपट्टी उभारण्यात आली असल्याची बाब भाजपा आमदार रमेशदादा पाटील यांनी निदर्शनास आणताच अशा अतिक्रमणांवर कारवाईचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.
नवी मुंबई येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात पीएपी आर ४८७ या भूखंड धारकाला एक कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत ओपन स्पेस २१ मध्ये लावण्यात आलेल्या २०० वृक्षांची देखभाल करण्याची परवानगी एमआयडीसी प्रशासनाकडून देण्यात आली होती परंतु सदर भूखंडधारकाने वृक्षांची देखभाल करण्याऐवजी या दोनशे वृक्षांची कत्तल करून या ठिकाणी अनधिकृत झोपड्या उभारून भाड्याने दिल्या आहेत. स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांकडून वारंवार याबाबत तक्रार करून देखील एमआयडीसी प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची बाब आमदार रमेशदादा पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच अशा अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे रूपा इन्फोटेक या कंपनीने नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले असल्याने त्यावर देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.
एमआयडीसीच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील २९५ औद्योगिक क्षेत्राचे सर्वेक्षण तीन महिन्यात केले जाईल व अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले. तसेच याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.