-->
आपला महाराष्ट्र 24

नवसाला पावणारी खरोशीची श्री केळंबादेवी

उरण (सुनिल ठाकूर ).
पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील जिते नाक्यावरून पूर्वेस साधारणतः दोन किलो मीटर अंतरावर पक्क्या डांबरी रस्त्याने जोडलं गेललं खरोशी गाव तसं बालगंगा नदीच्या काठी बसलेले. मुळत:च निसर्ग सानिध्य लाभलेल्या डोंगर दऱ्यांच्या कुशीत बसलेल्या या खरोशी गावाच्या उत्तरेस डोंगर माथ्यावर आहे. सर्वांच्या श्रद्धेचे श्री केळंबा देवीच मंदिर..
पेण परिसरातील व मुंबईपासून ७० कि. मी. अंतरावर असलेल्या व सर्वपरिचीत अशा भक्तांचे श्रद्धास्थान असणारी स्वयंभू, शाश्वत नी सदा जागृत असणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या वेळोवेळी संकटाच निवारण करणाऱ्या खरोशी येथील श्री केळंबादेवीची महती आपल्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे.

फार फार वर्षापूर्वी इथल्या डोंगर माथ्यावर ऋषींच वास्तव्य होत. बाळगंगा नदीच्या काठावरून या पवित्र ठिकाणी जाताना रस्त्याच्या बाळगंगा नदीच्या काठावरून या पवित्र ठिकाणी जाताना रस्त्याच्या बाजूला दुतर्फा पारिजातक, फणस, आंबा, चाफा यांची असंख्य झाडे आहेत. त्यामधून जाणाऱ्या वाटेवर नजर पडली की वाटतचं श्री केळबादेवी आपणास दर्शनासाठी बोलवित आहे. देवीच्या रस्त्याला लागलो की, निसर्गाचा अविष्कार असलेला हिरवागार, मनाला सुखद असा रम्य परिसर पाहिला की, मनाला जी एक शांती लाभते त्याची तुलनाच करता येणार नाही. मंदिराच्या परिसरात कुठेही पहायला मिळणार नाही इतक मोठ बेल वृक्षांच रानच्या रान आहे. तसेच केळी, चाफा. रामवृक्ष, कणेरी या सारख्या इतरही फुलझाडांनी परिसर फुलून गेलेला आपणास दिसून येईल, अशा ठिकाणी वास्तव करून आहे. तुमची आमची सगळ्यांची आई, हाकेला धावणारी, नवसाला पावणारी, श्रद्धास्थान असणारी आई श्री केळंबादेवी.

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे की, एके दिवशी गावातील एक गृहस्थ केळीची पाने आणण्यासाठी डोंगर माथ्यावर गेला असता त्याने एक केळ तोडली असता त्या केळीमधून लाल रक्त वाहू लागले. हा प्रकार पाहताच तो गृहस्थ घाबरला व सरळ तो गावात येऊन सदरचा प्रकार त्यांनी गावकऱ्यांच्या कानावर घातला. त्यांनी हे ऐकताच सर्व गावकरी त्या पडलेल्या चमत्कारिक दृश्याची पाहणी करण्याकरिता गेले असता त्यांनाही त्या केळीमधून लाल रक्त येत असल्याचे दिसून आले. या घडलेल्या दृश्यांची माहिती निष्णांत ज्यातिषाला सांगितली व त्या ज्योतिषाने सांगितले की, इथे निश्चितपणे भगवंताचे स्थान आहे. परमेश्वराचे स्थान आहे. या जागेवर देवीचे वास्तव्य आहे. त्यामुळे ज्या केळीतून लाल रक्त निघाले त्याच ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली. केळीच्या झाडातून प्रकट झालेल्या शाश्वत व स्वयंभू देवीला श्री केळबादेवी हे नाव देण्यात आले.

आजतागायत श्री केळबादेवी जागृत असल्याची अनेक कारणे भक्तगणाना प्रचिती आली आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करा वा संकटकाळी फक्त देवीच नामस्मरण करा म्हणजे आपल्या संकटाच निवारण करण्यासाठी धावून येणारच या बाबतीत किती तरी लोकांचे अनुभव आपणास ऐकावयास मिळतील म्हणून तर नवरात्र उत्सवा व्यतिरिक्त दर मंगळवारी बाहेरील गावातील तसेच पेण, पनवेल, उरण, अलिबाग, ठाणे, मुंबई येथील लोक मोठ्या प्रमाणावर श्री केळंबा देवीच्या दर्शनाला येत असतात.

श्री केळंबा देवीचा नवरात्र उत्सव दरवर्षी फार मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. घटस्थापनेच्या दिवशी गावातून देवीची पालखी वाजत गाजत देवळात नेली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस गावातील तसेच गावाच्या बाहेरील भक्तगण श्री केळंबा देवीच्या भक्तीपोटी, प्रेमापोटी व नवसापोटी देवळात दिवसरात्र वास्तव्य करून राहतात. नवरात्रीच्या उत्सवात नवस फेडण्यासाठी दूरशेत, जिते, बळवली, खारपाडा, गोर्विले, आंबिवली या पंचक्रोशीतील लोकांची खूपच रिघ लागलेली असते. देवीच्या वास्तवाचा, सकटकालीन दर्शनाचा अनुभव कित्येक लोकांना आल्यामुळे प्रत्येक वषी या भक्तगणातही खूपच वाढ झालेली दिसून येते. घटस्थापनेपासूनच्या नवव्या दिवशी श्री केळबादेवीची पालखी देवळातून निघून टाळ मृदुंगाच्या तालात भजन म्हणत गुलाल-बुक्का  उधळत वाजत गाजत मिरवणुकीने पुन्हा गावात आणली जाते. अशा या जागृत, स्वयंम् व नवसाला पावणाऱ्या श्री केळंबा देवीचे मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून म्हणजे शके १६०७ मध्ये बांधले होते. आजपर्यंत चारशे  वर्षे या मंदिरास झाल्याने सर्व गावकऱ्यांनी एक निश्चय केला व एक दिलाने एक मनाने मंदिराचा जिर्णोद्धार करून लाखो रुपयाचे भव्य दिव्य व आकर्षक मंदिर बांधले आहे. या मंदिरासाठी गावकरी मंडळीनी आपल्या समस्या अडचणी, संकट बाजूला सारून व भक्तगणांकडे मदतीचा हात मागून आज हे भव्य आणि दिव्य मंदिर उभे केले आहे.
   माऊली केळंबा मातेचा नवरात्र उत्सव
 १५ ऑक्टोंबर ते २३ ऑक्टोंबर असा नऊ दिवस चालणार आहे या नवरात्री नऊ दिवस भक्तगण मोठ्या श्रद्धेने नवस बोलण्यासाठी नवस फेडण्यासाठी येत असतात.नवरात्रीच्या उत्सवात नऊ दिवस लाखो भाविक दर्शन
 घेऊन डी जे च्या तालावर मनसोक्तपणे नृत्य करूनआनंद द्विगुणित करत असतात                  
 (धनाजी  घरत- खरोशीपेण)
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.