- प्रभूदास भोईर यांनी आयोजित केली सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी इफ्तार पार्टी
उरण. (सुनिल ठाकूर )
मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने देशभरात विविध ठिकाणी सर्व धर्मातील नागरिक इफ्तार पार्टीचे आयोजन करून सर्वधर्म समभाव, सामाजिक एकोपा जपण्यासाठी एकत्र येऊन इफ्तार पार्टीचे आयोजन करतात या प्रकारे कळंबोली खिडुकपाडा येथे दिनांक 28 एप्रिल रोजी प्रभूदास भोईर अण्णा यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी कळंबोली परिसरातील मुस्लिम समाज व सर्व जाती धर्मातील नागरिकांनी हजेरी लावत पार्टीचा आनंद घेतला. शहरातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमान चालिसा, भोंगे आदींमुळे राज्याचे राजकारण धार्मिक द्वेष निर्माण करून गढूळ करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जात आहे. परंतु अशा कुठल्याही धार्मिक द्वेषाला भीक न घालता सामाजिक सलोखा जपत प्रभुदास भोईर यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.
प्रभूदास भोईर दर वर्षी रमजान मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात.त्यावेळी बोलताना त्यांनी हिंदू- मुस्लिम भाई - भाई असा नारा देत धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांवर एक प्रकारे चपराक दिली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष सतिश पाटील,शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, प्रकाश म्हात्रे, आदींसह सर्व धर्मातील अनेक नागरिक उपस्थित होते. त्यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी रमजानच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अशा कार्यक्रमाचे आयोजन करून प्रभुदास भोईर यांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.

